आपला जिल्हा

गुरुपौर्णिमा का साजरी करावी?

संगमनेर

गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः, गुरुर्देवो महेश्वरः। गुरुर्साक्षात परब्रह्म, तस्मै श्रीगुरवे नमः।।

गुरुपौर्णिमा ही एक अशी परंपरा आहे जी आध्यात्मिक आणि शैक्षणिक स्थानातील सर्वच गुरूंना समर्पित होते. हिंदू कालगणने प्रमाणे आषाढ (जून-जुलै) महिन्यामध्ये येणारी पौर्णिमा ही गुरुपौर्णिमा किंवा व्यासपौर्णिमा म्हणून साजरी केली जाते.

गुरु म्हणजे आपल्या जीवनातील अंधार, अज्ञान दूर करून प्रकाशाकडे नेणारा आणि दिव्य ज्ञानप्राप्तीचा मार्ग दाखवणारी व्यक्ती असते जी कुठल्याही संकटात आपल्या पाठीशी भक्कमपणे उभी असते. या संसाररूपी भवसागरातून तरुण जाण्यासाठी गुरुचे मार्गदर्शन असणे आवश्यक आहे. साक्षात परमेश्वराला देखील सद्गुरूंची गरज वाटली म्हणून तर प्रभू श्री रामांनी वशिष्ठांचे आणि श्रीकृष्णाने संदिपनींची सेवा केली आणि त्यांना गुरु मानले.

श्रीव्यासमुनी कोण होते? गुरुपौर्णिमेला व्यासपौर्णिमा का म्हणतात?

महर्षि व्यास हे भारतीय संस्कृतीचे शिल्पकार होत. भारतीय संस्कृतीची मूळ संकल्पना आणि तिची जोपासना महर्षी व्यासांनीच केली आहे. पूर्वी वेद हा एकच होता ऋषी व्यासांनी वेदांचे नीटपणे विभाजन करून त्यांचे संपादन केले. वेदांचे चार भाग व्यासांनी केले आणि प्रत्येक विषयावर ग्रंथ लिहिले. महाभारत हा जगातील सर्वश्रेष्ठ ग्रंथ आहे. श्री व्यासांनी महाभारत सांगितले आणि श्री गणरायाने ते लिहिले. आषाढ शुद्ध पौर्णिमेला म्हणजेच गुरुपौर्णिमेच्या दिवशी श्रीवेदव्यास यांचा जन्म झाला म्हणून या पौर्णिमेला व्यासपौर्णिमा असे देखील म्हणतात. म्हणून गुरुपौर्णिमेच्या दिवशी व्यासांची पूजा करतात.

ऋषी व्यासमुनींची जन्म कथा

वशिष्ठ ऋषींचा मुलगा शतकीर्ती यांना गर्भात वेद मंत्राचे पठण करणारा पराशर हा मुलगा झाला. एकदा यमुना नदी पार करताना होडी वल्हविणाऱ्या धीवरकन्येची व परशर ऋषींची भेट झाली. तीचे सौंदर्य पाहून त्यांना स्त्रीसंगाची इच्छा झाली. कौमार्य भंग होणार नाही या अटीवर कन्येने पराशरांची इच्छा पूर्ण केली. पराशरांपासून तीला श्रीव्यास हा मुलगा आषाढ शुद्ध पौर्णिमेला झाला. ऋषी पराशर यांचे पुत्र असल्यामुळे श्रीव्यास यांना पराशर या नावाने देखील ओळखले जाते. पुढे ती कन्या राजा शंतनू जे हस्तिनापुर या राज्याचे राज्याधिकारी होते त्यांच्याशी तिचा विवाह झाला. त्यांनाच देवी सत्यवती या नावाने ओळखले जाते. सत्यवतीला कौमार्य अवस्थेत झालेला पुत्र श्रीव्यास हे पुढे व्दैपायन नावाच्या एका बेटावरती राहत होते म्हणून त्यांना कृष्ण व्दैपायन असे देखील म्हणतात.

गुरुपौर्णिमा कशी साजरी करावी?

जन्माला आल्यानंतर आपल्या जीवनामध्ये आपण एखादा तरी गुरू करावा असे म्हणतात. आणि त्या गुरूबद्दल प्रेम व्यक्त करण्याचा दिवस म्हणजे गुरुपौर्णिमा. या दिवशी आपल्या गुरु बद्दल भावपूर्ण आदरांजली आणि कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस. गुरुपौर्णिमेच्या दिवशी आपल्या गुरूंच्या पूजनासाठी त्यांच्या स्थानी जावे. त्यांची मनोभावे पूजा करावी आणि आपल्या गुरूंचे दर्शन घेऊन त्यांना काहीतरी गुरुदक्षिणा दयावी.

संपादक - अमोलजी राखपसरे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button